मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला होता. तसेच बुधवार रात्रीपासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांवर कोणताही परिणाम होणार नाही असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले होते.
मात्र अद्याप लॉकडाऊन जाहीर करून सुद्धा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने तातडीची १०,००० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरती करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात लवकरच जाहिरात देण्यात येणार आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार १२७ पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.