मुंबई : राज्यात विशेष करून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी बृहमुंबई महानगर पालिकेने कंबर कसली आहे.
मुंबईत मागच्या काही दिवसापासून रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे महापालिकेनं वैद्यकीय सुविधा उभारण्यावर अधिक जादा लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या ५ ते ६ आठवड्यांत शहरात ३ जम्बो कोविड रुग्णालयं उभारण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मानस असल्याची माहिती मुंबई मनपाने दिली आहे. या प्रत्येक रुग्णालयात २ हजार बेड्स असतील. यासोबतच २०० आयसीयू आणि ७० टक्के ऑक्सिजन बेड्स असणार आहेत.
आत दररोज मुंबईत ९ हजाराच्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लक्षणं दिसत नसताना अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. परिस्थिती गंभीर झाल्यावर अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतं. ही गोष्ट लक्षात घेऊन पालिकेनं शहरातील रुग्णालयांमध्ये ३२५ आयसीयू बेड्स वाढवले आहेत. त्यामुळे एकूण आयसीयू बेड्सचा आकडा २ हजार ४६६ वर पोहोचला आहे.