जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देणारा शासन निर्णय रद्द करा
एसएफआय - डीवायएफआयची जिल्हाधिकारी यांचामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बीड :- (प्रतिनिधी )नवीन शैक्षणिक वर्षास नुकतीच सुरुवात झाली असून जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने या रिक्त जागांवर पदभरती करावी अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( एसएफआय ) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डीवायएफआय ) ने केली होती. मात्र पदभरती करण्याची गरज असताना जिल्हा परिषद शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याचा एसएफआय – डीवायएफआय तीव्र निषेध करत आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आहे.
या निर्णयामुळे शिक्षक पदभरतीसाठी तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी व युवकांचे भवितव्य अंधारात आले असून विद्यार्थी व युवकांचा हक्काचा रोजगार शासन त्यांच्याकडून हिसकावून घेत आहे. शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द करावा व ताबडतोब शिक्षक पदभरती करावी अशी मागणी एसएफआय – डीवायएफआयने बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यातील शिक्षकभरती साठी तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थी – युवकांना सोबत घेऊन एसएफआय – डीवायएफआयच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, डीवायएफआयचे जिल्हा सचिव विशाल देशमुख, एसएफआयचे जिल्हाध्यक्ष लहू खारगे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोकाटे, शिवा चव्हाण, जिल्हा कमिटी सदस्य युवराज चव्हाण, पवन चिंचाने, आकाश जाधव, डीवायएफआयचे बीड जिल्हा कोषाध्यक्ष सुहास जायभाय, बीड जिल्हा सहसचिव सुहास झोडगे, जिल्हा कमिटी सदस्य कुंडलिक खेत्री, सिद्राम सोळंके, मनोज देशमुख, मनोज स्वामी, मदन वाघमारे, प्रशांत मस्के, रमेश कचरे, दत्ता कचरे, भगवान पवार, प्रकाश उजगरे, प्रवीण निसर्गंध आदी पदाधिकारी, विद्यार्थी व युवक उपस्थित होते.