पत्रकार – शैलेश पुरोहित
नाशिक – नाशिक शहरातील सिडकोमधील सिंहस्थनगरमधील सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान वाढदिवसानिमित्त फिरायला गेलेल्या सहाजणांचा शुक्रवारी वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी एका मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
सिंहस्थनगरमधील नऊजण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी वालदेवी नदी परिसरात फिरण्यास गेले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सर्वजण पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी उभे होते. त्यावेळी पाण्यात तोल जावून काहीजण पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने त्यांना वाचविण्यासाठी सर्वांनी पाण्यात उडी मारली. रिक्षा चालकामुळे नऊ जणांपैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र सहाजण पाण्यात बुडाले. सायंकाळी ७ वाजेनंतर अंधार झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. घटनास्थळी वाडीवर्हे पोलीस, तहसीलदार व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर दाखल झाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरु केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य चालू करण्यात आले असता सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वांचे मृतदेह हाती लागले आहेत या सर्वांचे मृतदेह जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून नासिक येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.