पंढरपूर : राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा जागेवर आमदार भरत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर केली होती. त्यात बलाढ्य नेत्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी होणाऱ्या गर्दीमुळे आता मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रसार होताना दिसून येत आहे.
मागच्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर आणि मंगळवेढा भागात जोरदार सभा झाल्या होत्या. या सभेत अजित पवारांना ऐकायला मतदारांनीही कोरोनाचे नियम पायदळी तुडवत मोठी गर्दी केली होती. या सभेत अनेकांनी मास्क सुद्धा लावले नव्हते.
मात्र या राजकीय नेत्यांच्या सभांमुळे आता कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात वाढू लागल्याचे धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे . मंगळवेढ्यात शुक्रवारी ४२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह सापडले असून ज्या गावात अजित पवारांची सभा झाली त्या बोराळे गावात ८ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
त्यात पंढरपूरमध्ये शुक्रवारी तब्बल १५१ नवीन करोना रुग्ण सापडले असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५८६ पर्यंत गेल्याने स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. येत्या १२ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा व पंढरपुरात ६ सभा होणार असून या सभेनंतर कोरोना संसर्ग रुग्ण संख्येचा स्फोट होऊ शकतो अशी चिंता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.