गेल्या काही दिवसांपासून कोरोना लस देणयास सुरुवात केली होती. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी गेल्या आठवड्यापासून लस देण्यास सुरुवात केली गेली. अशातच कोरोना लस घेतल्यानंतरचे परिणाम काही नागरिकांना जाणवू लागले आहेत. ठाणे, भिवंडीत सुरुवातीला कोरोना लस घेतलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला होता. आता गोरेगावमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा कोरोना लस घेतल्यानंतर दीड तासात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
जोगेश्वरीच्या लसीकरण केंद्रामध्ये दुपारी ३. ३७ वाजता या वृद्धाला लस टोचण्यात आली. यानंतर लगेचच त्यांना भोवळ आल्याने ते खूर्चीतच कोसळले. ते ३.३० वाजता केंद्रात पोहोचले होते. त्यांना सीरमच्या कोविशिल्ड लसीचा ०.५ मिलीचा डोस देण्यात आला होता. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधीत विकार असे गंभीर आजार होते, असे मुंबई पालिकेने सांगितले आहे.
गोरेगावचे रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाने सोमवारी जोगेश्वरीच्या मिल्लत नर्सिंग होममध्ये कोरोनाची लस घेतली. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच ते खूर्चीवरून कोसळले. यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. मात्र, लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईत अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याने लगेचच या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोना लसीमुळे झाला असा संबंध जोडण्यास नकार दिला आहे.