उल्हासनगर । उल्हासनगरमध्ये एका २५ वर्षाच्या तरुणासोबत अवघ्या १३ वर्षीय मुलीला लग्नाच्या बोहल्यावर चढवण्याचा डाव विठ्ठलवाडी पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी वधू-वराकडील ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर जवळील माणेरे गाव येथील मौर्या नगरीमध्ये बालविवाह सुरू आहे. त्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २५ वर्षीय तरुणासोबत विवाह रचण्यात येत असल्याची माहिती विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांना मिळताच, त्यांनी पोलिसांच्या टीमसह लग्नस्थळ गाठले. लग्न थांबवून बालवधूची रवानगी कॅम्प नंबर ५ मधील महिला व बाल विकास केंद्रात केली आणि वर मुलगा अभिजित राजगुरू, त्याची आई सुनीता राजगुरू, वडील त्रंबके राजगुरू, वधूची आई सविता देवकर, वडील राहुल भानुदास देवकर आणखीन एक अशा वधू-वराकडील ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लग्न थाटणाऱ्या मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून त्यांनी बालविवाह का लावण्याचा प्रयत्न केला? यासोबत अनेक प्रश्नांची सरबत्ती करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया केली जाणार अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली.