अंधेरी – महाराष्ट्रात जरी लॉकडाउन लागला नसला तरी कडक निर्बंधाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अंतर्गतच आजपासून बसमध्ये उभं राहून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त आसनक्षमते एवढेच प्रवासी बसमध्ये बसू शकतात,असा नवा नियम बेस्टमार्फत तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बेस्ट बससाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाश्यांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळपासून रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे. सकाळी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग आपल्या कार्यालयात जात असताना आज त्यांना बस स्थानकाबाहेर बराच वेळ बसच्या रांगेत उभे राहावे लागले. याचे कारण म्हणजे आता केवळ आसन क्षमतेनुसार प्रत्येक प्रवाशांना बसमध्ये प्रवास करता येणार आहे. परंतु या नियमामुळे प्रवाशांना फार मोठा विलंबाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये बदल व्हावा अथवा बेस्ट बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.
बेस्टने असं नियोजन केलं तर?
चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी सकाळी ६ ते १० या वेळेत बेस्ट बसेसच्या फेऱ्या वाढवल्या किंवा प्रत्येक २ मिनिटांनी बेस्ट बसने प्रवाश्यांना आपली सेवा उपलब्ध केली तर सकाळचा बेस्टचा वेळ सत्कर्मी लागेल.
सकाळी बेस्टच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावल्यास त्यांच्यावरील ताणही कमी होईल आणि रात्री ५० टक्के कर्मचाऱ्यांना बोलावल्यास कामगार वर्ग योग्यवेळी घरी देखील पोहचेल.
मुंबईतील मुख्य गर्दीच्या स्थानकांवरच हे नियोजन व्हावे,जेणेकरून प्रवासी वर्गांना त्रास होणार नाही.