मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता जास्त असल्यामुळे याचा फटका मराठी नाट्यसृष्टीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी सुरळीत सुरू झालेली मराठी नाट्यसृष्टी लॉकडाऊनमुळे पुन्हा कोलमडून पडेल आणि रंगकर्मींची अवस्था वाईट होईल, या भितीपोटी रंगमंच कामगार,निर्माते आणि कलाकारांनी लॉकडाऊन करू नका अशी मागणी केली आहे.
जर राज्यात लॉकडाऊन लागला तर पुन्हा मागच्या वर्षासारखा फटका सिनेसृष्टीला बसेल. अनेक अभिनेत्यांनी विविध माध्यमांतून मागणी केल्यानंतर सरकारने ५० टक्के क्षमतेने सिनामागृह सुरू करण्याला परवानगी दिली. असं असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागला तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येतील, अशी चिंता कलाकारांना सतावत आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेता भरत जाधव यांनी लॉकडाऊन न करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना पुन्हा लॉकडाऊनचं संकट कोसळू नये. तसेच नाटक आज पुर्णपणे सावरलं नाही. अशातच पुन्हा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेल, आणि त्याचा थेट परिणाम आमच्या उपजीविकेवर होतो. त्यामुळे राज्य सरकारने नाट्यगृह बोलण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती, असं भरत जाधव यांनी म्हटलं आहे