सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील देवाचीमाळ येथे एका फॅक्टरीमध्ये करण पवार या १४ वर्षाच्या मुलाचा कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की,यामध्ये मुलाची छाती कापली गेल्याने हृदय आणि फुप्फुस दोन्ही उघडे पडले होते.अशा अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये हृदय फुप्फुस शल्य विशारद डॉ.विजय अंधारे यांनी पुढाकार घेतला अन् त्यांच्या हाताला यश आलं.
या अपघातानंतर दिसणारे दृश्य हे अत्यंत विदारक होते. मुलाचे फुप्फुस बंद अवस्थेत उघडे पडले होते. छातीतील सर्व हाड तुटली होती तर सर्व स्नायू कापले गेले होते.हृदयाचे ठोके पडत असताना उघड्या डोळ्यांनी दिसतं होते. अपघातामध्ये जखमी झालेला मुलगा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सीएनएस हॉस्पिटलमध्ये आला. त्याला श्वास घेता येत नसल्याने श्वासाची नळी टाकून तत्परतेने जखमी मुलाला मार्कंडेय रुग्णालयामध्ये डॉ.विजय अंधारे यांच्याकडे उपचारासाठी आणण्यात आले.
शस्त्रक्रियेची टिम तयार करून रुग्णाला बेशुद्ध अवस्थेत हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये हलवण्यात आलं.रुग्णालय व्हेंटिलेटरला जोडून भुलेखाली जखमेची पूर्ण तपासणी करण्यात आली. रुग्णाचे फुप्फुस बंद पडले होते, ते व्हेन्टिलेट करून फुगवण्यात आले, फुप्फुसातून बाहेर जाणारी हवा बंद करण्यात आली. हृदयाच्या नसा उघड्या पडून त्यातून रक्त जातं होत. त्यानंतर छातीची हाडे मोडली होती. ती एकमेकांच्या जवळ आणून फिक्स करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे शस्त्रक्रियेच्या तासाभरानंतरच रुग्ण शुद्धीवर येऊन चक्क बोलू ही लागला. पवार कुटुंबीयांचा हातचा गेलेल्या मुलाला परत जीवदान मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. शेवटी ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण प्रत्यक्षात उतरताना सोलापूरमध्ये पाहायला मिळाली.