कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात मृत्यूचे तांडव अजूनही कमी झालेले नाही.त्यामुळे राज्यात १ मे महाराष्ट्र दिन हा यंदाही साधेपणाने साजरा करण्यात यावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील १ मे पर्यंत ठेवण्यात आलेला लॉकडाऊन आता १५ मे पर्यंत ठेवण्यात आलेला असून महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतली जावी.
तसेच कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही म्हणून मे च्या१५ तारखेपर्यंत सक्तीचे लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे असा निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता विलगिकरण हा त्यावरचा प्रभावी उपाय आहे त्यामुळे कमीत संख्येने एकत्र येऊन महाराष्ट्र दिन साजरा करताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक राहील, तसेच एकमेकांमधील एक फुटाच्या अंतराने उभे राहावे असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच केवळ जिल्हा मुख्यालय कार्यालयात मोजक्याच उपस्थितीमध्ये सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात यावे.तसेच सूचनांमध्ये सांगण्यात आलेल्या ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालय समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये.
तसेच काही अपरिहार्य कारणाने पालकमंत्री कार्यक्रमस्थळी येऊ शकले नाहीत तर वेळ वाया न घालवता जिल्हा मुख्याधिकारी व आयुक्तांनी ध्वजरोहण करावे अश्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत