पुणे : सध्या संपूर्ण देशभसरात कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच देशभरात मोठया संख्याने रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुगसंख्या केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर वाढवता दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने युद्ध पातळीवर लसीकरण सुरु केले आहे. मात्र आज अनेक ठिकाणी लस अभावी लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आज केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच १२ कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार सिरम आणि परदेशी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचंही विधान अजित पवारांनी केले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. अनेक ठिकाणी आता ऑक्सिजन प्लांट उभे राहत आहेत. जेणेकरून कोरोनाची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच ऑक्सिजन प्लांटस हे भविष्यात कोरोनाची साथ संपल्यानंतरही वाया जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.