बीड – वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता बीड मध्येही रेमडेसीवीर इंजेक्शन चा खुलेआम पणे काळाबाजार होत आहे. राज्य सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढविण्यास व रेमडेसीवीर इंजेक्शन चे शुल्क कमी करण्याचे सांगितले असूनही बीड मध्ये रुग्णांना १४०० रुपयांना मिळणारं इंजेक्शन ५४०० रुपयांपर्यंत विकलं जात आहे.
असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केला आहे. अमर नाईकवाडे यांच्या म्हणण्यानुसार ड्रग्स इन्स्पेक्टर हाच काळ्या बाजाराचा मुख्य सूत्रधार असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्यांना निलंबित केलं जावं.अशी लेखी तक्रार नगरसेवक नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली आहे.
नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात रेमडेसीवीर इंजेक्शन चा पुरवठा केला जात होता परंतु या पद्धतीमुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना इंजेक्शन ची अवैधरीत्या गैरविक्री करण्याची संधी मिळाली नव्हती.
म्हणूनच पुन्हा जिल्हा रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी-विक्रीचा काळा बाजार करण्यात आला. काल दिवसभरात ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांनी ठरवून दिलेल्या मेडिकल दुकानातून, १४०० रुपयांचे इंजेक्शन ५४०० रुपयात सामान्य नागरिकांना विक्री करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातून पुरवठा होत असताना पुन्हा खाजगी रुग्णालयांमधील मेडिकल दुकानातून रेमडेसिविरची विक्री करणे म्हणजेच रेमडेसिविर च्या काळाबाजार व साठेबाजीच्या गैरकामांना पाठींबा देणे आहे.
त्यामुळे या काळाबाजार करणारा मुख्य सूत्रधार ड्रग्स इन्स्पेक्टर डोईफोडेंवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा.नाहीतर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करू.असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे..