ज्या खाडीत मुकेश अंबानी घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी संबंधित मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला त्याच मुंब्रा रेती बंद खाडीजवळ आणखी एक मृतदेह सापडला आहे. आज मुंब्रा रेती बंदर खाडीजवळ जो मृतदेह सापडला आहे, त्याची ओळख पटली आहे. शेख सलीम अब्दुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो ४८ वर्षांचा होता. शेख सलीम अब्दुल मुंब्रा रेतीबंदरचाच राहणारा होता. पोलीस अधिकाऱ्यांकडे हा मृतदेह सोपवण्यात आला आहे.
अब्दुल यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यांना लगेचच जवळच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी यामध्ये काही चुकीचे घडले नसल्याचे पोलिसांचे मत आहे. पण शवविच्छेदन अहवालातूनच बऱ्याच गोष्टी समोर येतील.