नागपूर : नागपूरमध्ये कोरोना संसर्ग झापटीने वाढताना दिसत आहे . एकीकडे संसर्ग वाढत असताना भाजपाकडून राजकारण केले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये दररोज हजारो रुग्ण वाढत आहे. नागपूरमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे.
मात्र कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन व लसीकरण हाच पर्याय आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लसी उपलब्ध होत नाहीत आणि ‘उत्सवा’ची इव्हेंटबाजी भाजपकडून करण्यात येत आहे. हा प्रकार मढ्यावरचे लोणी खाण्याचा असून केवळ ‘मी पुन्हा येईन’ च्या नादात महाराष्ट्राच्या जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे पाप महाराष्ट्रद्रोही भाजपा करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
अतुल लोंढे यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये लोंढे म्हणतात, नागपूरमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना महापालिकेचा बेजबाबदारपणा आणि भाजप नेत्यांचा खोटारडेपणा सुरु आहे. महापालिकेतील लसींचा साठा संपत असून उद्यापासून लस मिळाली नाही तर मृत्यूंचे तांडव उभं राहण्याची भीती आहे. असे असताना केवळ क्रेडिट घेण्यासाठी इव्हेंटबाजी करत जनतेच्या जीवाशी खेळ चालवला आहे असे अतुल लोंढे यांनी बोलून दाखविले आहे.