मुंबई : कोरोना लसीच्या मुद्द्यावरून आघाडी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात चांगलेत शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. महाराष्ट्रात पुढच्या तीन ते चार दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याचे काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. मात्र या आरोपानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाविक आघाडी सरकारवर टीका केली होती.
आता यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या स्थितीत राज्य सरकारनं सातत्याने केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागितली जात आहे.मात्र, काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, कोरोना आपत्ती निवारणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. तसेच भाजपा प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला होता.