संभाजी नगर : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने नवी यादी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर झाली आहे. यामध्ये अनेक नव्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खासदार सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाल्याचे दिसत आहे. तसेच संभाजी नगर मधून शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि आमदार अंबादास दानवे यांची सुद्धा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे यांनी गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचे संघटन वाढवल्याचे पाहायला मिळाले. शिस्तबद्ध नियोजन, पक्षाच्या ध्येय धोरणानूसार आंदोलनांची आखणी, दिल्ली ते गल्ली अशा सगळ्या विषयांवर त्यांनी परखड भूमिका घेतली आहे.