नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर लगावलेले आरोप त्यांनी फेटाळले आहेत. या संदर्भात बोलताना खा. सावंत म्हणाले की, आज पर्यंत कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असं कधीच होणार नाही असे स्पष्टीकरण या प्रकरणात त्यांनी दिलेले आहे.
संसदेत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणाचा आवाज उठवल्यानंतर खासदार सावंत यांनी मला धमकी दिली अशी लेखी तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली होती. त्यावरून शिवसेनेवर टीका होत आहे. मात्र, सावंत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
यावर बोलताना सावंत म्हणाले की, खासदार राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात, तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. पण धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही.
पुढे बोलताना सावंत म्हणाले की, उलट नवनीत राणा ह्याच लोकांना धमक्या देत असतात. त्यांना राईचा पर्वत करण्याची सवयच आहे. मागच्या एक वर्षातली त्यांची लोकसभेतली भाषणं बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात त्यांची बोलण्याची पद्धत, शब्द बघा. तुमच्या लक्षात येईल असे सावंत यांनी बोलून दाखवत लावलेले आरोप फेटाळले आहेत.