सातारा : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासंदर्भात रचण्यात आलेले षडयंत्र सातारा पोलिसांनी उघडीस आणले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता सातारा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पुण्यातील दोघे आणि साताऱ्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे,
समोर आलेल्या माहितीनुसार आमदारांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनामीच्या भीतीने त्यांच्याकडून लाखो रुपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला काही रक्कम सुद्धा देण्यात अली होती.
मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भंडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले. २२ एप्रिल रोजी साताऱ्यातील त्या युवतीने मयूर यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला.
आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करण्यासाठी काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे संशयितांनी त्या युवतीला आमिष दाखवले होते. त्याबदल्यात तिला वेळोवेळी ९० हजार रुपये देण्यात आले मात्र हा प्रकार मनाविरुद्ध होत असल्यामुळे तिने मयूर यांच्या कानावर घालून सदर प्रकरणाचा भांडाफोड केला.