पंढरपूर – राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघा ची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे
राष्ट्रवादीनं भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे पंढरपुरात उद्यापासून राजकीय वातावरण तापणार आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर भालके यांचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित असल्यानं पंढरपुरात उद्या राजकीय धुळवड पहायला मिळणार आहे.