राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे तसेच रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच आज रुग्णालये सुद्धा अपुरी पडू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता भारत जाधव याने एका इमारतीत राबवलेल्या उपक्रमाची माहिती आपल्या सोशल मीडियाच्या (इंस्टाग्राम) माध्यमातून दिलेली आहे. यावरच न थांबता त्याने आपल्या पोस्टमधून लोकांना कोरोना रुग्णांसाठी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, गाळे देण्याचे आवाहन केले आहे.
भरत जाधवने इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत म्हटले की, सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे…माझ्या सोसायटी मध्ये ४ जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट वन बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटी मधील २ रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा – औषधे देत होता, रिकाम्या फ्लॅट धारकांचा ६ महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले.
१५ दिवसांनी सर्व जण बरे झाले. आता तेच फ्लॅट इमरजेंसीसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊंन आपले कर्तव्य करण्याची.” अशी पोस्ट सोशल मीडियावर त्याने केली आहे.