देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशात व राज्यात आरोग्य यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत असताना सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत जात असून याचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील खेड्यात ही मोठ्या प्रमाणात होत आहे.
यात भरीला भर म्हणजे नागरिकांमध्ये कोरोना चाचणी विषयी अनेक गैरसमज असल्याचे दिसत आहे.कोरोना चाचणी केली तर आपला कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह च येणार या गैरसमजुतीमुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिक कोरोना चाचणी करण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक आरोग्य विभागाकडून कोरोना संदर्भात वेळोवेळी जनजागृती केली जाते. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा शरीरात तशी लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करून घेणे हे आपल्या सोबत इतरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे.
योग्य उपचार वेळीच घेतल्याने आजार पूर्णतः बरा होत असल्याचे स्थानिक आरोय केंद्राकडून सांगण्यात येत असूनही सोलापूर मधील नागरिक चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह येईल या गैरसमजुतीने घाबरून प्रशासनाला सहकार्य करत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
लक्षणे आढळुन आल्यावर ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला न घेणे, विनामास्क खुलेआमपणे बाहेर पडणे या नागरिकांच्या बेजवाबदार वागण्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून सोलापूर आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.