राज्यात अनेक ठिकाणी आधीच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांचे जीव गेले आहेत. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरत आहेत. अशातच नाशिकमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले आहेत. मात्र गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना लावण्यात आला होता. परंतु गळतीमुळे हा ऑक्सिजन वाया गेल्यामुळे रुग्णांना आता नवीन ऑक्सिजन कोठून उपलब्ध करून द्यावा अशी चिंता लागली आहे.
नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवताना नाकेनऊ येत आहे. त्यातच ऑक्सिजनचा साठा असलेल्या टाकीच्या पाईपलाईनलाच गळती लागल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात परत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र ऑक्सिजन मिळाले नाही तर परिस्थिती गंभीर होण्याचे चिन्हे दिसत आहेत.