मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. त्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी ठरलेली कोविशील्ड लसीचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच याच मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध पेटलेले पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्य सरकारला लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी असे पत्रात नमूद केले आहे. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.
यावर राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना सवाल विचारला आहे. पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल उपस्थित केला आहे.