मुंबई : ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी मला शासकीय बंगल्यावर बोलावून चौकशी थांबवण्यासाठी मंत्री परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लगावला होता.
या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले होते. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या दोन्ही मुलींची शपथ घेतली होती. आता यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण तो बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ कधीची घेणार नाही, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री अनिल परब यांची पाठराखण केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असणाऱ्या सचिन वाझे यांनी पत्र लिहून अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते याच प्रकरणी संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्र काय देशाच्या इतिहासात घडलं नाही. मात्र, महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले होते.