देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर कोरोना लसीकरणाला सुरवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली होती. तसेच जनतेला कोरोना लसीकरण करून घेण्याचे आव्हान केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर अनेकांनी लसीकरण करून घेतले होते. मात्र एकीकडे पंतप्रधान मोदी एम्समध्ये जाऊन लसीकरण करून घेत असताना दुसरीकडे मात्र त्त्यांच्याच पक्षाचे बिहार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टरांना घरी बोलावून लस टोचून घेत आहेत.
मात्र आता भाजपाच्या या आमदारावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सिंह असं या आमदाराचं नाव आहे. अशोक यांनी कोरोना लसीकरणासाठी रूग्णालय किंवा लसीकरण केंद्रावर न जाता डॉक्टरांनाच स्वतःच्या घरी बोलावून घेतले होते. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वैद्यकीय कर्मचारी भाजपा आमदारास त्याच्या घरीच लस देताना पाहायला मिळत आहेत.
आज कोरोनाच्या भीतीने लसीकरणाला वेग आला आहे. लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्राबाहेर मोठ्याच्या मोठ्या रांगा लागत असताना भाजपा आमदाराला VIP ट्रीटमेंट का असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.