पुणे : पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता तसेच संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यात पीएमपी बसेस सेवा सुद्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती. मात्र याचा फटका अत्यावशक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचारी वर्गाला बसताना दिसून येत आहे.
त्यातच आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अखेर पीएमपी प्रशासनाने बसेसच्या काही फेऱ्या चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (बुधवार) शहरातील २० मार्गांवर ४१ बसेस धावणार आहेत. यामध्ये केवळ पालिका आणि शासकीय कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र इतरांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून शहरातील पीएमपीची सेवा स्थगित केली होती. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच्या बससेवेबाबतचा निर्णय पालिकेच्या कोर्टात गेला होता. अखेरीस मंगळवारी अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनुसार ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.