नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या अडचणी अधिक वाढवताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
देशातील करोना स्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आले असून राज्यांना लशींचा अपुरा पुरवठा करण्यात आला, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. त्या काँग्रेस शासित राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता.
या बैठकीत त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी सरकारने कोरोना स्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळली असून देशात लशीची टंचाई निर्माण करून लस निर्यातीला प्राधान्य दिल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. तसेच पुढे त्या म्हणाल्या,की सार्वजनिक सभा,प्रचार सभा कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने रद्द करायला हव्या होत्या. केंद्र सरकारने ज्या आर्थिक योजना जाहीर केल्या त्याचा राज्यात अपेक्षित परिणाम झाला की नाही याची विचारणा सोनिया गांधी यांनी केली आहे.