मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात महराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात केंद्राला पत्र सुद्धा लिहिले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
या चर्चेदरम्यान राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यावर डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र सरकार त्यासाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन हर्ष वर्धन यांनी दिले होते.
काही दिवसांपूर्वी डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात आपयशी ठरत असल्याची टीका केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेचे फलित सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.