मुंबई : महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या ११८व्या बॅचचा दीक्षान्त सोहळा येत्या मंगळवारी पार पडणार होता. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावणार होते मात्र आता या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हा कार्यक्रम ऑनलाइनच होणार आहे. तसेच सध्या कोरोनाचे संकट सुद्धा गडद होताना दिसत असल्यामुळे याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ११८ बॅचमधील ६६८ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, दीक्षान्त सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा सामूहिक डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता .
आज संपूर्ण राज्याला शिस्त आणि कायद्याचे प्रशिक्षण देणाऱ्या या ऐतिहासिक संस्थेची यामुळे राज्यभरात बदनामी झाली. या प्रकरणी ‘एमपीए’कडून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यात करोनाचा प्रकोप वाढत असून, सरकारकडून लॉकडाउन लावण्याबाबत खल सुरू आहे, तसेच मंत्र्यांच्या दौऱ्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे एमपीएच्या दीक्षान्त सोहळ्यास मुख्यमंत्री हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.