मुंबई : राज्यात विशेष करून मुंबईतील काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण मुंबईत लसीकरण युद्ध पातळीवर सुरु करण्याचा विचार मुंबई मनपा करत आहे. याला मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. त्या आज पत्रकार माध्यमांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. तसेच नव्या उपाययोजना महापालिका व राज्य सरकारनं तयार केल्या असून, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण सुरू केलं आहे. कोरोना लस केंद्रावर उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यास जावे.
तसेच सध्या तरी घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार नाही. मात्र वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत सध्या तरी ३० ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु आहेत. तर ६० खासगी ठिकाणी लस दिल्या जात आहे. सध्या तरी मुंबईत दुसऱ्या कोरोना डोसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. जे पहिले येतील त्यांना लस दिली जाईल.