मुंबई : गेल्या वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहेात. येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील कामगार संघटनांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, यांच्यासह राज्यातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी वर्गाबरोबरच कामगारांचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे ते आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळेच या कामगार वर्गाची काळजी घेण्यासाठी राज्य शासन एकत्रितपणे प्रयतन करीत आहे.आज जवळपास सव्वा वर्षांहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहोत. हे करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सुरु राहणे आवश्यक असून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी कोविड सुसंगत वर्तणूक आत्मसात करणे आवश्यक आहे.कामगार संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्वपूर्ण नियमाचे पालन करणे किती आवश्यक आहे हे पटवून देणे आवश्यक आहे.