मुंबई – देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चाला आहे. रुग्णांची संख्याही आता वाढू लागली आहे. परंतु चित्र आता काहीस वेगळं असल्याचे समोर येत आहे. आता जास्त प्रमाणात रुग्ण हे चाळी किंवा झोपडपट्टीत नसून इमारतींमध्ये आढळत आहेत. परिणामी इमारती सील होऊ लागल्या आहेत. सध्या मुंबईत एकूण 578 इमारती सील झाल्या आहेत. यापैकी अंधेरी पश्चिम विभागात सर्वाधिक 137 इमारती आणि मुलुंडमध्ये 1490 मजले सील करण्यात आले आहेत. चाळी आणि झोपडपट्ट्यांच्या तुलनेत आता इमारतीमधील रुग्णांची संख्या 90% जास्त आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. त्यावेळेला या व्हायरसने चाळी-झोपडपट्ट्यांना विळखा घातला आणि रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढली. कडक निर्बंध लाऊन आणि चेस दि व्हायरस, माझी मुंबई-माझी जबाबदारी, मिशन झिरो अशा अनेक मोहीम आखून मुंबई महानगरपालिकेने हा संसर्ग नियंत्रणात आणला. मुंबई आता कोरोनामुक्त होणार असे वाटत असताना गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढू लागला.
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या स्थितीचा आढावा घेऊन माध्यमांशी संवाद साधला होता. पालिकेच्या नियमानुसार एका इमारतीत दोन बाधित रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला, तर पाच रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. त्यानुसार 2 मार्च रोजी मुंबईत 2016 मजले सील केले, तर 145 इमारती सील होत्या. महिन्याअखरीस यासंख्येत मोठी वाढ होऊन झाली आहे.