मुंबई : देशभरात नाही तर जगभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी रामबाण ठरलेल्या कोविशील्ड लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालावर अमेरिकेने घातलेल्या निर्यातबंदी मुद्द्यावरून आजच्या सामना अग्रलेखातून काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ‘युनो’सारख्या संघटनेने आणि मानवतेची चाड असणाऱ्या सर्वच देशांनी या माणुसकीशून्य धोरणाचा जाब अमेरिकेला विचारायलाच हवा! असा सवाल विचारण्यात आला आहे.
तसेच अमेरिकेला मानवी हक्क आणि मानवतेचा खरेच इतका पुळका असेल तर कोरोनासारख्या जागतिक संकटकाळात अमेरिकेची ही मानवता कुठे हरवली आहे? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे. काही दिसांपूर्वी सिरमचे CEO अदार पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ट्विट करत कच्चा मालावरील निर्बंध हटवण्याची विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून अमेरिकेला टोला लागवण्यात आला आहे.
आज अधिकाधिक लोकांचे प्राण वाचावे, यासाठी भारताने आता 18 वर्षांच्या वरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. लसीकरणाचा हा कार्यक्रम किंवा उत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी लसींच्या उत्पादनाचा वेग वाढणेही तितकेच आवश्यक आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी लादून अमेरिकेने आढेबाजीचा जो अमानुषपणा चालविला आहे तो संतापजनक आहे. ‘युनो’सारख्या संघटनेने व मानवतेची चाड असणाऱ्या सर्वच देशांनी या माणुसकीशून्य धोरणाचा जाब अमेरिकेला विचारायलाच हवा! असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.
ज्याच्याकडे सत्ता आहे, सामर्थ्य आहे, ताकद आहे त्याचं मन विशाल असायला हवं. मदतीला धावून जाणारं अंतःकरण त्यांच्याकडे असायला हवं. पण दुर्दैव असे की, अनेकदा सत्तेच्या गुर्मीतून आढ्यता आणि आडमुठेपणाच वाढताना दिसतो. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या बाबतीत तर हे नेहमीच घडते. आपण बलशाली आणि सामर्थ्यवान असल्याच्या गर्वातून इतरांना तुच्छ लेखण्याची दुष्प्रवृत्ती जन्माला येते आणि अशा सत्ता व महासत्ता मग माणुसकीदेखील खुंटीला टांगून उन्मत्तपणे वागू लागतात. जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाच्या वैश्विक संकटात ‘सुपर पॉवर’ असा लौकिक असलेल्या अमेरिकेचे वर्तनही माणुसकीशून्य म्हणावे असेच आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.