कल्याण। होळी आणि शिमग्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील होळीच्या सणावर कोरोनाचं सावट असल्याने अनेकांच्या उत्साहावर विरजण पडलं. त्यातच होळी आणि रंगपंचमीसाठी व्यापारी वर्गाने मोठी तयारी करून ठेवली होती. मात्र, आता लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
कोणताही सण असला की कल्याण आणि उल्हासनगरमधील गजानन मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळायची. अगदी कपड्यांपासून फटाक्यांपर्यंत आणि सजावटीच्या वस्तुंसाठी प्रत्येक जण गजानन मार्केटकडे धाव घ्यायचे. मात्र, मागील वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमध्ये हे मार्केट पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले.
अश्यातच आता होळी आणि रंगपंचमीच्या सणावर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट असल्याने व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान होणार आहे. रंगपंचमीच्या सणासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कल्याण, उल्हासनगरमधील अनेक व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांच्या वस्तू दुकानात आणून ठेवल्यात. रंगीबिरंगी पिचकाऱ्या, फुगे रंगपंचमीचे साहित्य या वस्तूंनी बाजारपेठ सजलेली असतानाच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे नेहमीच गजबजलेला मार्केट परिसर आता शांत पाहायला मिळत आहे.
त्यामुळे लॉकडाऊनच्या झळा सोसलेल्या व्यापारी वर्गासमोर मोठ संकट उभे ठाकले आहे. व्यापाऱ्यांनी रंगपंचमीच्या सणासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करून ठेवली आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून लागलेले निर्बंध व कोरोनाची वाढती रुग्ण संख्या यामुळे खरेदीसाठी ग्राहक बाहेर निघत नसल्याने करायचं तरी काय असा प्रश्न या व्यापारीवर्गाला पडला आहे.
मागील वर्षी देखील होळी आणि रंगपंचमी सणावर कोरोनाचा थोडा का होईना प्रभाव पडला होता आणि आता या वर्षी पुन्हा शिमग्याच्या सणावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी शासनाच्या नियमांचं पालन करणं गरजेच आहे,असे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे.