आठवडाअखेरीस येणारा होळीचा सण साजरा करण्यासाठी सर्व बाजारपेठा सज्ज झाली आहे. मात्र ह्यावर्षी करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होळी व धुळवडीचा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक होळी साजरी केली असता करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे ह्यावर्षी सर्व कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहेत.
या सणासाठी वेगवेगळ्या गुलाल व रंगांची तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबरीने निरनिराळ्या प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध असून यंदाच्या सणाचे ते आकर्षण ठरणार आहे.
होळीचा सण ४-५ दिवसांवर आला असला तरीसुद्धा सरकार कोणत्याही क्षणी टाळेबंदी जाहीर करेल या भीतीपोटी होळीच्या सणादरम्यान लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीकरिता नागरिक पुढे येऊ लागले आहेत. मात्र एकत्र जमून सार्वजनिक होळी साजरी केल्यास करोनाचा प्रसार होऊ शकतो ही भीतीही नागरिकांना सतावत आहे.