रत्नागिरी दि .१२- राज्यात अनेक ठिकाणी करोना झपाट्याने पसरत आहे. रत्नागिरी जिह्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यंदाच्या शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी पूजेसाठी घरोघरी नेण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. याचबरोबर, मुंबईसह बाहेरगावी असलेल्या चाकरमानींनी यंदा शक्यतो या उत्सवासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यास प्रशासनाने सुचवलेले आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रामधून येणार्या चाकरमान्यांना चाचणी बंधनकारक आहे.
दरवर्षी कोकणकऱ्यांसाठी गणपती व शिमगोत्सव हे सण मोठ्या उत्साहात पार पडत असतात. हे दोन सण कोकणकरी खूप आनंदाने साजरे करत असतात. खास या सणांसाठी मुंबईकर चाकरमानी हजारोच्या संख्येने गावी जातात. परंतु यावर्षीदेखील करोनाचे सावट आल्याचं दिसून येत आहे. शिमगोत्सवात कोकणात प्रत्येकाच्या घरी देवाची पालखी फिरवली जाते. परंतु त्यातून करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा उत्सव साजरा करण्याबाबत निर्बंध जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या संदर्भात गुरूवारी प्रसृत केलेल्या आदेशानुसार गावातील मंदिराचे विश्वस्त आणि पालखीधारकांसाठी करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेच्या पालखीची रुपे लावणे, सजवण्याचा कार्यक्रम करावयाचा असून २५ ग्रामस्थ आणि मानकर्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेट होईल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पालखी शक्यतो वाहनातून नेणे अपेक्षित आहे. ते शक्य नसल्यास पालखीधारकांनी स्वतः वाहून न्यावी. मात्र पालखीबरोबर ५० पेक्षा जास्त लोकांनी जमू नये. सालाबादप्रमाणे ग्रामदेवतेची पालखी घरोघरी नेण्यास बंदी किंवा गर्दीमध्ये नाचवण्यास बंदी आहे.