मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या मुंबई मनपाच्या अडचणी अधिक वाढवताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ४५ वयापर्यंत सरसकट सर्व नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसेच ही मागणी मान्य सुद्धा करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीमुळे जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर त्रास होऊ नये म्हणून मुंबई महानगर पालिका शाळेत जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अमेय घोले यांनी मुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ते आपल्या पत्रात म्हणतात की, ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींना कोरोना लसीकरणाची परवानगी दिल्यामुळे १ एप्रिलपासून सर्व ठिकाणी गर्दी सारखी परिस्थिती होणार आहे. तसेच या गर्दीमुळे जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून जवळच्या पालिका शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे. सर्व अटी नियम पाळून लसीकरणाची गती वाढू शकेल आणि सर्वांना घरच्या जवळ ही सवलत मिळेल असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.