नवी मुंबई- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकऱणास नेरूळ येथील मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात प्रारंभ झाला असून अश्विन थोन्टाकुडी या २८ वर्षीय नागरिकाला १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणाचा पहिला मान मिळाला.
आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये कोव्हीड लस घेण्याविषयी अतीव उत्सुकता होती. या वयोगटासाठी निश्चित केलेल्या ठाणे जिल्ह्यातील ५ केंद्रामध्ये सेक्टर १५ नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयाचा समावेश असून केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी केल्यानंतर व त्यावर केंद्र निवडून अपॉईंटमेंट आरक्षित (Booking) केल्यानंतरच लसीकरण केले जात आहे. रात्री उशीराने सदर पोर्टलवर अपॉईंटमेंट बुकींग लिंक प्रदर्शित झाल्यावर १५ मिनिटातच पहिल्या दिवसाच्या २०० लाभार्थ्यांनी आजच्या दिवसाची अपॉईंटमेंट आरक्षित केली. या लाभार्थ्यांचे लसीकरण रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित बूथमध्ये कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून दुपारी १ वाजता सुरू करण्यात आले.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार https://selfregistration.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे यांची विशेष नोंद घ्यावयाची आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण केंद्र निवडून त्याठिकाणी दिनांक निवडून आपली अपॉईंटमेंट आरक्षीत करावयाची आहे. आणि त्या वेळेला, त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे. सदर नोंदणी व अपॉईंमेंट बुकींग प्रक्रिया पूर्ण करूनच लसीकरण केंद्रावर जायचे असून लसीकरणासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेल्या कोणत्याही व्यक्तींची गैरसोय होणार नाही याची काळजी महानगरपालकेमार्फत घेतली जात असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.