पंढरपूर – मंगळवेढा निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन आपापल्या पक्षाच्या वतीने प्रचार केला. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात जाऊन सभा घेतली व प्रचारादरम्यान राज्य सरकारवर टीका केली होती.सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
याच संदर्भात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी गाण्यातून देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. सोमवारी गायक आनंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात गेले होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. व ते मूळचे मंगळवेढ्याचे असल्याने ते तिथे गेले होते.
याच दरम्यान आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर गाण्यातून सडकून टीका केली आहे. हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय, असा इशारा गायक आनंद शिंदे यांनी गाण्यातून देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस याला कशाप्रकारे प्रतिउत्तर देणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.