मुंबई दि. १७- मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणामुळे महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची बदली होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी पद देण्यात आले आहे.
काहीच वेळापूर्वी हेमंत नगराळे यांनी मुंबई आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर लगेचच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना,’सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहे.लवकरच सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबई पोलीस यातून बाहेर पडेल. मुंबई पोलीस दलाचे काम आता नव्याने सुरू करण्यास आम्ही तयार आहोत.घडलेल्या प्रकाराचा तपास एनआयए करत आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही.मात्र,या प्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास त्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल,अशी प्रतिक्रिया मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.