नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे. रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अभिनेता रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, रजनीकांत यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या पुरस्कारासाठी रजनीकांत यांचे अभिनंदन केले आहे.