15 दिवसात एकाच ठिकाणी तब्बल 3 ट्रान्सफाॅर्मरचा मृत्यू ; फलटण वीज महावितरणचा सावळा गोंधळ

चौकशी लावण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी


फलटण :फलटण तालुक्यातील गुणवरे गावातील तगारे डिपी विद्युतभार अधिकचा नसतानाही केवळ 15 दिवसात तब्बल 3 वेळा नादुरुस्त झाला व तीन वेळा बदलण्यात आला. डिपीची वारंवार नादुरुस्त होण्याची सातत्यपूर्ण मालिका खंडीत करण्यात वीज महावितरण अपयशी ठरत आहे. फलटण तालुक्यात बहुतांश ठिकाणी डिपी वारंवार आणि अत्यल्प कालावधीत सातत्याने नादुरुस्त होण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे.

डिपी वारंवार नादुरुस्त होत असल्याने दरम्यानच्या काळात शेतक-यांना प्रचंड त्रास, शेतपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, जनावरांचे हाल आणि आता शेतक-यांचा एकंदरीत प्रचंड आक्रोश पहायला मिळत आहे. गुणवरे गावातच भोसले डिपी हा देखील नादुरुस्त झाला आहे.

वीज महावितरण विषयीच्या सर्व तक्रारी व मागण्या घेऊन गुणवरे येथील शेतक-यांनी शिवसेना ठाकरे गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे संपर्क साधला व सदर समस्या सोडवण्याची मागणी केली. त्यानुसार शिवसेना फलटण तालुका ठाकरे गट व शेतक-यांच्यावतीने फलटण वीज महावितरण कार्यालयास निवेदन देऊन वारंवार नादुरुस्त होणा-या डिपींची चौकशी लावण्याची व लवकरात लवकर अतितात्काळ तगारे डिपी व भोसले डिपी बसवण्याची मागणी करण्यात आली.

सदर कामात तात्काळ कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने शेतक-यांसह भव्य व आक्रमक आंदोलन लोकशाही मार्गाने केले जाईल असा आक्रमक इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. निवेदन देताना शिवसेना ठाकरे गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *