पंढरपूर:-सध्या पंढरपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूकीच वारं वाहू लागलं आहे.अश्यात पंढरपूरात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार भरतनाना भालके यांचं निधन झाल्यानंतर आता पंढरपूरात पुन्हा पोटनिवडणुक लागली. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भागीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.राष्ट्रवादीच्या या उमेदवाराला महाविकास आघाडीतील सर्वपक्षांचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे समाधान अवताडे यांच्या प्रचाराची धुरा स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
एकीकडे अजितदादा पवार आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असा कलगीतुरा पंढरपुरात रंगल्याचं चित्र आहे.त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोत अजित दादा शिवसेनेच्या कार्यालयात शिवसैनिकांसोबत बसल्याचं पाहायला मिळत आहे.
खरंतर,महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पंढरपूर विधानसभा मतदार संघात लढत होत असल्याने अजित दादा शिवसैनिकांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहेत.याचदरम्यान त्यांनी पंढरपुरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात भेट दिली आणि शिवसैनिकांशी चर्चा ही केली.यातून ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी किती प्रतिष्ठेची आहे,हे लक्षात येतंय.