जळगाव : पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस माशासारखे तडफडत असून ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरी ठरत नसल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, मला वाटते त्यांना रात्री बेरात्री सत्ता कधी येईल याची देखाली त्यांना स्वप्न पडत असतील. पण सध्या सरकार पडणार असल्याचे ते सांगत आहेत. वेगवेगळ्या तारखांचे त्यासाठी भाकीत करत आहेत. ते ब्राम्हण असल्याने त्यांचे भाकीत खरे ठरेल, असे मला वाटत होते. पण त्यांचे कोणतही भाकीत खरे ठरले नसल्याचे खडसे म्हणाले.
भारतीय जनता पक्षामधील अनेक आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी कमी करण्यासाठी पुन्हा आपले सरकार येणार असल्याचा आशावाद फडणवीस त्यांच्या आमदारांना देत आहेत. पण हे सरकार पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. मात्र त्यांना याच ज्ञान नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.