मुंबई : संपूर्ण राज्यभरात कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. त्यात मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.त्यातच कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
या संदर्भात बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की, कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविक ‘प्रसाद’ म्हणून करोना घेऊन येवू शकतात. त्यामुळं या भाविकांनी आपापल्या स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावं. मुंबईतही जे भाविक परतणार आहेत त्यांनाही क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
९५ टक्के मुंबईकर हे करोना नियमांचे पालन करत आहेत. तर, उर्वरित ५ टक्के लोक नियमांचे उल्लंघन करतात. या लोकांमुळं इतर लोकांनाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळं सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय ठरु शकतो असे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.