जळगाव दि.१९ – उन्हाळ्याची दाहकता जशी जाणवू लागली आहे, तशीच धरणगावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तब्बल २० ते २२ दिवसांनी एकदा तेही फक्त दिड तास पाणी पुरवठा होत असल्याने काही दिवसांपूर्वी संतप्त महिलांनी जळगाव पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता.
पण त्यानंतरही पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे.राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या धरणगाव विधानसभा मतदारसंघात पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या धरणगाव शहरात तर तब्बल २० ते २२ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतापलेल्या धरणगावकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धरणगाव शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केवळ योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कृत्रिम पाणीटंचाईला धरणगावकर कंटाळले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा यंत्रणेला शिस्त लागत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.