मुंबई । सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला अडचणीत आणण्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. आज मनसुख हिरेन प्रकरण, सचिन वाझे या सर्व घडामोडीवर भाजपा शिवसेनेला अडचणीत आणण्याचे काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आमदार आणि माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मोठा झाला. ज्या झाडावर तुम्ही वाढलात, ते झाडच तुम्ही खायला निघालात. त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते असा सणसणीत टोला जाधव यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे.
यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री अमित शहा यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांचा संदर्भ देताना जाधव म्हणाले की, गुजरातचे गृहमंत्री अमित शाह होते त्यावेळी पोलिस मुख्य डी. जी वंजारी यांनी आरोप केले होते,
मात्र सदर घटनेत अमित शहा यांनी राजीनामा दिला का? मोहन डेलकरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावं दिली, त्यांचं काय झालं? त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही असा टोला त्यांनी लगावला होता.