दादर- राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाला आहे. कमी झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मात्र राज्यातील जनतेला याचा काही फरक पडत नसल्याचे चित्र दिसून येते. मुंबईत हजारो नागरिक सतत ये-जा करत असतात. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. नागरिक कोणतीही फिकीर न करता विनामास्क फिरताना दिसत आहेत. मुंबईतील वाढती कोरोना संख्या पाहता महानगरपालिका आयुक्त सतत नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. मात्र मुंबईच्या दादर मार्केटमध्ये नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडलेला दिसतो आहे.
दादर मार्केटध्ये रोज मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईकरांना कोरोनाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दादर फुल मार्केटमध्ये रोज फुले, भाज्या घेण्यासाठी प्रचंड गर्दी असते. दादर मार्केट आणि दादर स्टेशन परिसर मध्यवर्ती आणि सोयीचे असल्याने नागरिकांची मोठी गर्दी या परिसरात असते. नागरिकांची मोठी गर्दी पाहून ते पुन्हा कोरोनाला आमंत्रण देत आहेत असे म्हणायला हरकत नाही. दादर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून येत नाही. लोकांनी मास्क घातले आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ता फज्जा उडवल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांनी १० हजाराचा टप्पा पार केला होता. हीच रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या वर गेली आहे. दादर परिसर आणि दादर मार्केट त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे.