मुंबई। फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. यावरून भाजप आक्रमक होऊन राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसवर टीका करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे अशी टीका केली. तसंच काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही म्हटलं. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो असा टोला भाजपाला लगावला. “वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचं सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.